बेळगाव : कार आणि ट्रक यांच्यात झालेल्या भीषण अपघातात एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला असून तिघे गंभीर जखमी झाले आहेत.
पहाटे पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गावर हुक्केरी तालुक्यातील संकेश्वरजवळ ही घटना घडली आहे.
संकेश्वर परिसरात पहाटेच्या सुमारास ट्रक आणि कार यांच्यात जोरदार धडक झाली. या भीषण अपघातात कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला, तर तिघेजण गंभीर जखमी झाले आहेत.
महाराष्ट्र नोंदणी असलेल्या कारची धारवाडकडून येणाऱ्या ट्रकशी समोरासमोर धडक झाली. कारमध्ये प्रवास करणाऱ्या चौघांपैकी एकाचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जखमी तिघांना तातडीने स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
मृत आणि जखमींची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत. ही घटना संकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली असून पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
अपघातात कारचा पूर्ण चुराडा झाला असून मृतदेह आणि जखमींना कारमधून बाहेर काढताना उपस्थितांचे हृदय पिळवटून टाकणारे दृश्य पाहायला मिळाले.
#accident
#sankeshwar
#cartruckaccident