बेळगाव : दुचाकीवरून चालवत असताना अचानक नागसापाचे पिल्लू हातावर चढले. प्रकार लक्षात येताच घाबरलेल्या दुचाकीस्वाराने तात्काळ रस्त्याच्या कडेला दुचाकी थांबवली. तोपर्यंत सापाचे पिल्लू हातावरून दुचाकीच्या आतील भागात शिरले. दैव बलवत्तर म्हणून अनर्थ टळला.
बेळगाव शहरात आज सकाळी हा प्रकार घडला . अक्षय नावाचा युवक आपल्या एक्सेस दुचाकीवरून जात असताना अचानक नागसापाचे पिल्लू त्याच्या हातावर चढले. अचानक नागसापाचे विषारी पिल्लू गाडीतून हातावर आल्याने अक्षय यांना काहीच सुचले नाही. त्यांनी प्रसंगावधान राखून हाताची हालचाल न करता दुचाकी रस्त्याच्या कडेला घेतली. मात्र तोपर्यंत ते पिल्लू सरपटत दुचाकीच्या आतील भागात शिरले.
सर्पमित्र आनंद चिट्टी यांना ही माहिती मिळाल्यानंतर ते घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी मेकॅनिकच्या मदतीने दुचाकीचा समोरील भाग उघडून पाहणी केली. काही वेळ शोध घेतल्यानंतर सापाची शेपटी दिसताच त्यांनी त्याला बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. मात्र दुसऱ्याच क्षणी त्या सापाने फणा काढत जोरदार फुत्कार टाकला. आनंद चिट्टी यांनी प्रयत्नांती त्या नागसापाच्या पिल्लाला सुरक्षितपणे पकडले. यावेळी परिसरात नागरिकांची मोठी गर्दी झाली होती.
काही महिन्यांपूर्वी कोर्ट आवारातदेखील एका दुचाकीमध्ये नागराज आढळला होता. त्यानंतर ही घटना घडली आहे.
वाहन सुरू करण्यापूर्वी काळजी घ्या :
सर्पमित्र आनंद चिट्टी यांचे आवाहन
याबाबत बोलताना आनंद चिट्टी यांनी हे अस्सल नागसापाचे सुमारे पाच ते सहा दिवसांचे विषारी पिल्लू असल्याचे सांगितले. “पावसाळ्यात विशेषतः जुलै महिन्यात अशा घटना वाढतात. दुचाकींमध्ये उबदार जागा मिळाल्यामुळे साप लपून बसतात. लहान नागसापदेखील आक्रमक असतात, त्यामुळे नागरिकांनी वाहन सुरू करण्यापूर्वी काळजी घ्यावी,” असे आवाहन त्यांनी केले.
#anandchitti
#cobrainbike
#incident
#bn7news
