होस्पेट : आमदार गवियप्पा यांचे होस्पेटमधील फोटोशूट बऱ्यापैकी गाजतंय. फोटोशूटचा हा सारा खटाटोप मंत्रीपदाच्या शर्यतीसाठी तर नाही ना ? असा सवाल लोकांतून होतोय.
कर्नाटकात काँग्रेस विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत डी.के. शिवकुमार यांची मुख्यमंत्रीपदी निवड झाल्यानंतर नव्या मंत्रिमंडळाच्या विस्ताराबाबत राजकीय हालचालींना वेग आला आहे. विजयनगर जिल्ह्यातील आमदार एच.आर. गवियप्पा यांना मंत्रिपद मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात असून, त्यासाठी त्यांनी भव्य फोटोशूट केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
इडिगा समाजाच्या कोट्यातून मंत्रिपदासाठी गवियप्पा यांचे नाव आघाडीवर असल्याचे सांगितले जात आहे. विजयनगरचे आमदार गवियप्पा, तसेच इडिगा समाजातील नेते बी.के. हरिप्रसाद आणि मधु बंगारप्पा यांच्यात मंत्रिपदासाठी चुरस असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर गवियप्पा यांना संधी मिळू शकते, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
दरम्यान, बी.के. हरिप्रसाद यांना राज्यसभेची संधी देण्याचा पर्याय काँग्रेस उच्च नेतृत्वाकडून विचाराधीन असल्याचेही बोलले जात आहे. इडिगा समाजाचे प्रतिनिधित्व कायम ठेवण्यासाठी गवियप्पा यांना मंत्रिमंडळात स्थान देण्याबाबत डी.के. शिवकुमार आणि पक्षश्रेष्ठींनी हरिप्रसाद यांच्याशी चर्चा केल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे.
इंदिरा गांधी यांच्या काळापासून काँग्रेस पक्षाशी निष्ठावान राहिलेल्या गवियप्पा यांना यावेळी मंत्रिपद मिळेल, अशी त्यांच्या समर्थकांना आशा आहे. गवियप्पा यांची मंत्रिमंडळात निवड झाल्यास नव्याने स्थापन झालेल्या विजयनगर जिल्ह्याच्या विकासाला प्राधान्य दिले जाईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
#mlagaviyappa
#PoliticsUpdate
#hospetphotoshoot