येळ्ळूर : दिनेश ओऊळकर यांची भारतीय रिझर्व बँकेने अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक क्षेत्रासाठी आदर्श उपनिधी तयार करणाऱ्या उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल येळ्ळूर महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने त्यांचे अभिनंदन केले.
यावेळी झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी वामनराव पाटील हे होते.
बेळगावचे सुपुत्र महाराष्ट्र-कर्नाटक सीमाप्रश्न तज्ज्ञ समितीवर कार्यरत असलेले आणि सहकार क्षेत्रातील ज्येष्ठ प्रशासकीय अधिकारी दिनेश ओऊळकर यांची भारतीय रिझर्व बँकेने अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक क्षेत्रासाठी आदर्श उपनिधी तयार करणाऱ्या उच्चस्तरीय समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे. ही नियुक्ती भुषणावह आहे. म्हणून महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने अभिनंदन करण्याचा ठराव संमत करण्यात आला.
प्रारंभी प्रकाश अष्टेकर यांनी प्रास्ताविक केले आणि बैठकीचा उद्देश स्पष्ट केला. महाराष्ट्र एकीकरण समितीचे नेते माजी जिल्हा पंचायत सदस्य कै.अर्जुनराव गोरल, कै. मोनाका गोरल आणि कै. यल्लाप्पा कुगजी यांना दोन मिनिटे मौन पाळून श्रद्धांजली वाहण्यात आली.
या बैठकीत मध्यवर्ती म. ए.समितीने आयोजित केलेल्या 22 जून रोजीच्या मोर्चाची जागृती करून मोर्चा यशस्वी करणे, महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी धरणे आंदोलन कार्यक्रमात सहभागी होणे, समितीची पुनर्रचना करणे, युवकांना समितीच्या प्रवाहात आणणे आदी विषयावर सखोल चर्चा करण्यात आली.
यावेळी राजू पावले दुद्धापा बागेवाडी, उदय जाधव, नागेश बोबाटे, शिवाजी सायनेकर आदींनी आपले विचार मांडले.
या बैठकीला माजी तालुका पंचायत सदस्य चांगदेव परीट, दयानंद उघाडे, राकेश परीट, दौलत पाटील, मारुती पाटील, बाळू पाटील प्रकाश मालुचे, प्रकाश पाटील, यल्लुपा पाटील, नेताजी गोरल, बाळकृष्ण पाटील, भीमराव पुण्याणावर, कृष्णा शहापूरकर, संजय हुंदरे, कृष्णा बिजगरकर, रामा पाखरे, रमेश धामणेकर, अरुण मुरकुटे आदी बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
आभार प्रदर्शन सुरज गोरल यांनी मांडले.