
चिक्कोडी : हुक्केरी तालुक्यातील बेणीवाडा गावात सरकारच्या ‘अन्नभाग्य’ योजनेअंतर्गत वितरित करण्यात येणारा तांदूळ बेकायदेशीररीत्या वाहतूक करत असलेला टेम्पो हुक्केरी पोलिसांनी पकडला.
बेणीवाडा गावात रेशन तांदळाची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती मिळताच नागरिकांनी तातडीने ‘ 112’ या आपत्कालीन क्रमांकावर संपर्क साधला. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत केए 25 बी 1506 क्रमांकाच्या मालवाहू वाहनाची तपासणी केली. तपासणीदरम्यान विविध रंगांच्या 46 पोत्यांमध्ये तांदूळ आढळून आला. पोलिसांनी सर्व पोती जप्त करून हुक्केरी पोलीस ठाण्यात आणली.
हुक्केरीचे अन्न निरीक्षक प्रवीणकुमार सागर यांनी पंचांच्या उपस्थितीत पोत्यांमधील तांदूळ उतरवून वजन केले असता एकूण 1780 किलो तांदूळ असल्याचे निष्पन्न झाले. जप्त केलेल्या तांदळाची अंदाजे किंमत 35 हजार 600 रुपये असल्याचे सांगण्यात आले. तपासाचा भाग म्हणून प्रत्येक पोत्यातून 20 किलो तांदळाचे नमुने घेऊन अन्न विभागाने जप्त केले.
या प्रकरणी टेम्पो चालक निंगराज मल्लाप्पा मुगळी (वय 24, रा. बेणीवाडा) याला ताब्यात घेऊन चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान त्याने परिसरातील गावांमधून कमी दरात शिधा तांदूळ खरेदी करून तो शेजारच्या महाराष्ट्रातील कोल्हापूर येथे अधिक नफ्यासाठी विक्रीस नेत असल्याची कबुली दिली.
याप्रकरणी हुक्केरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास सुरू आहे.