बेळगाव : मला कर्नाटक प्रदेश काँग्रेस कमिटी (KPCC) अध्यक्ष होण्याची अपेक्षा होती. मात्र आता ज्येष्ठ नेते बी. के. हरिप्रसाद यांची अध्यक्षपदी निवड झाली असून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण काम करू, असे सार्वजनिक बांधकाम मंत्री सतीश जारकीहोळी यांनी सांगितले.
प्रसारमाध्यमांशी बोलताना ते म्हणाले की, सध्या मंत्रिमंडळातील 20 पदे रिक्त आहेत. एवढ्या मोठ्या संख्येने जागा रिक्त ठेवून सरकार चालविणे कठीण आहे. त्यामुळे या महिन्याच्या अखेरीस दुसऱ्या टप्प्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे.
बेळगाव जिल्ह्यात पाच वरिष्ठ आमदार असून मंत्रिपदासाठी मोठी स्पर्धा आहे. पक्षश्रेष्ठी सर्व बाबींचा विचार करून निर्णय घेतील. जिल्ह्याला आणखी एक मंत्रिपद मिळाले पाहिजे.
2028 मध्ये मुख्यमंत्री कोण होणार याबाबतच्या चर्चेवर प्रतिक्रिया देताना जारकीहोळी म्हणाले, “2028 मध्ये मुख्यमंत्री कोण होईल, याचा निर्णय काँग्रेस विधिमंडळ पक्ष घेईल. सध्या आमचे पहिले उद्दिष्ट पक्षाला पुन्हा सत्तेत आणणे हेच आहे.”
केपीसीसी (KPCC) अध्यक्षपदाबाबत बोलताना ते म्हणाले, “मला अध्यक्ष करण्याची मागणी होती, हे खरे आहे. मात्र ‘एक व्यक्ती – एक पद’ या नियमामुळे मी अध्यक्ष होऊ शकलो नाही. माझ्याबाबत पसरवण्यात आलेल्या सर्व अफवा आता संपुष्टात आल्या आहेत. त्या बातम्यांना कोणताही अधिकृत आधार नव्हता. त्यामुळे अशा गोष्टींना फार महत्त्व देण्याची गरज नाही.”, असेही जारकीहोळी म्हणाले.
#satishjarakiholi
#pressmeet
#BKhariprasad