बेळगाव : खासबागमधील राघवेंद्र कॉलनीतील वश्री साईराम मंदिरात विशेष पूजा व धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी साईबाबांच्या मूर्तीची तब्बल एक हजार आंब्यांनी आकर्षक सजावट करण्यात आली होती. या अनोख्या आरासने भाविकांचे लक्ष वेधून घेतले होते.
या विशेष आम्र-अलंकार पूजेच्या निमित्ताने बेळगाव शहरासह परिसरातील विविध भागांतून हजारो भाविकांनी मंदिरात हजेरी लावून दर्शन घेतले. साईनाथांचे दर्शन घेण्यासाठी दिवसभर भाविकांची मोठी गर्दी झाली होती. संपूर्ण मंदिर परिसर आंब्यांच्या सुगंधाने आणि साईनामाच्या जयघोषाने भक्तिमय वातावरणात न्हाऊन निघाला होता.
या विशेष पूजेचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे सायंकाळी धूपारती आणि महा-मंगळारतीनंतर सुवर्ण सजावटीसाठी वापरण्यात आलेले एक हजार आंबे प्रसाद स्वरूपात भाविकांना वितरित करण्यात आले.
मंदिर मंडळाचे प्रमुख महेश वेरणेकर यांच्या नेतृत्वाखाली दर्शन व प्रसाद वितरणासाठी सुयोग्य आणि शिस्तबद्ध व्यवस्था करण्यात आली होती.
दरम्यान, मंदिराचे सचिव श्रीधर तिगडी यांनी माहिती देताना सांगितले की, श्री साईराम मंदिरात दररोज नियमितपणे चार वेळा विशेष पूजा आणि आरती आयोजित केल्या जातात. मंदिरातील धार्मिक कार्यक्रमांना भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत असल्याचेही त्यांनी नमूद केले.
#saimandir
#poojaarcha
#belgaum
#BN7