धर्मस्थळ ग्रामअभिवृद्धी योजनेमधून येळळूर येथे वात्सल्य घराचे हस्तांतरण

Ravindra Jadhav
धर्मस्थळ ग्रामअभिवृद्धी योजनेमधून येळळूर येथे वात्सल्य घराचे हस्तांतरण
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

येळळूर : श्रीक्षेत्र धर्मस्थळ ग्रामअभिवृद्धी योजनेच्या ज्ञान विकास कार्यक्रमांतर्गत महात्मा फुले गल्ली, येळळूर येथील श्रीमती जनाबाई हुवन्नावर यांना वात्सल्य घर बांधण्यासाठी 1 लाख 40 हजार रुपयांचा निधी मंजूर झाला होता. मंजूर निधी मधून त्यांचे घर पूर्ण झाले असून, त्या वात्सल्य घराचा हस्तांतर कार्यक्रम धर्मस्थळ संस्थेचे जिल्हा संचालक सतीश नाईक यांच्या हस्ते पार पडला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बेळगाव जिल्हा जनजागृती घटक सदस्य दुदाप्पा बागेवाडी होते. तर पाहुणे म्हणून योजना अधिकारी ज्योती जोळद, वलय अधिकारी सहदेव बजंत्री, समन्वय अधिकारी शिल्पा भंडारी, माजी ग्रामपंचायत सदस्य रमेश धामणेकर, प्रा. सी.एम. गोरल, लक्ष्मण छत्र्यान्नवर, पत्रकार बी. एन. मजुकर, ज्योती डोन्यान्नवर आदी उपस्थित होते.

प्रारंभी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात करण्यात आली. प्रास्ताविक व मान्यवरांचे स्वागत सहदेव बजंत्री यांनी केले. यावेळी बोलताना जिल्हा संचालक सतीश नाईक म्हणाले, धर्मस्थळ अभिवृद्धी योजनेमधून बेळगाव जिल्ह्यातील विविध मतदारसंघांमध्ये तीन वर्षात सुमारे 100 वात्सल्य घरे आम्ही बांधून दिली आहेत. त्याचबरोबर अनेक गावात तलाव निर्मिती, शाळा, स्मशानभूमी, मंदिर जीर्णोद्धार, आरोग्य व कृषी खात्यासाठी धर्मस्थळ अभिवृद्धी संस्थेकडून वेळोवेळी अनुदान दिले जाते. येळळूर गावामध्ये दोन वात्सल्य घरे मंजूर झाली आहेत.

यावेळी बोलताना दुदाप्पा बागेवाडी म्हणाले, धर्मस्थळचे प्रमुख डॉ. वीरेंद्र हेगडे व माई हेमावती हेगडे यांच्या मार्गदर्शनाखाली येळळूर गावामध्ये महिलांसाठी अनेक योजना आणल्या गेल्या आहेत. गावातील मंदिरे व शाळेसाठी अर्थसहाय्य केले, गोरगरिबांना वेळोवेळी आर्थिक मदत करीत असतानाच येळळूर गावामध्ये दोन वेळा व्यसनमुक्ती शिबीर भरून युवकांना व्यसनापासून मुक्त केले.
यावेळी बोलताना प्रा. सी.एम गोरल म्हणाले, धर्मस्थळ सारख्या बिगर सरकारी संस्थेकडून, इतक्या मोठ्या प्रमाणात लोकोपयोगी कामे राबविली जातात याचे आम्हाला कौतुक वाटते. धर्मस्थळ संस्थेकडून चालविण्यात येणाऱ्या योजनांचा लोकांना खूप फायदा होत आहे, गरिबांसाठी तर यांच्या योजना वरदानकारक आहेत. यावेळी लक्ष्मण छत्र्यान्नवर यांनीही आपले विचार मांडले.

यावेळी मारुती ताशिलदार, करिष्मा पठाणी, सुनिता धामणेकर, शांता हुंदरे, निकिता लोहार, निलाबाई कोकणे, सुनिता छत्र्यान्नवर, सुनिता मेलगे, लक्ष्मी हुवान्नवर आदी उपस्थित होते. शेवटी ज्योती जोळद यांनी आभार मानले.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article