विघ्नहर्त्याच्या आगमन सोहळ्यात केबल- फांद्यांचे विघ्न नको ! लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाचे निवेदन

Ravindra Jadhav
विघ्नहर्त्याच्या आगमन सोहळ्यात केबल- फांद्यांचे विघ्न नको ! लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाचे निवेदन
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव, दिनांक 23 ( प्रतिनिधी) : विघ्नहर्त्याच्या आगमन सोहळ्यास अडथळा ठरणाऱ्या विविध कंपन्यांच्या केबल वाहिन्या आणि झाडांच्या फांद्या हटविण्याची मागणी लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाने केली आहे.

गणेशोत्सव अवघ्या काही दिवसांवर आला आहे. त्या पार्श्वभूमीवर बेळगावातील काही गणेशोत्सव मंडळे मूर्तिकारांच्या कार्यशाळेतून गणेशमूर्ती आपल्या मंडपांमध्ये नेण्याचे नियोजन करत आहेत . गणेशमूर्ती आगमनाआधी शहरातील प्रमुख मार्गावरील खड्डे त्वरित मुजवावेत, नरगुंदकर भावे चौक, गणपत गल्ली, रामदेव गल्ली, समादेवी गल्ली, टिळक चौक, कपलेश्वर रोड या मार्गाची डागडुजी करावी. आवश्यकतेनुसार डांबरीकरण करावे. गणरायाच्या आगमन आणि विसर्जन मार्गातील लोंबकळणाऱ्या केबल वाहिनी, झाडांच्या वाढलेल्या फांद्या हटवाव्यात, तसेच मिरवणूक मार्गावरील अडथळे असलेले टिलोफोन खांब बदलावेत, रस्त्याच्या दुतर्फा उभ्या केलेल्या गणपत गल्लीतील गाड्या हलविण्याबाबत उपाययोजना करावी आदी मागण्या लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळ शिष्टमंडळाने महानगरपालिका आयुक्त अशोक दुडगुंडी व महापौर सविता कांबळे यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

अनेक सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्ती 15 फुटांपेक्षा उंच आहेत. त्यामुळे या मूर्ती मंडपामध्ये तसेच विसर्जनासाठी नेताना खूप काळजी घ्यावी लागते. त्यामुळे खड्डे लवकरात लवकर बुजवावेत. तसेच खड्डे बुजवल्यानंतर असमतोल झालेले रस्ते समप्रमाणात करावेत अशी मागणीही महामंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

यावेळी लोकमान्य टिळक गणेशोत्सव महामंडळाचे अध्यक्ष विजय जाधव, नगरसेवक मनपा गट नेते गिरीश धोंगडी, हेमंत हावळ, सुनिल जाधव, अरुण पाटील श्याम बाचुळकर,रवी कलघटगी, नितीन जाधव, प्रवीण पाटील, गजानन हांगीरगेकर, अर्जुन राजपूत, राजकुमार खटावकर, अजित जाधव, महेश सुतार आदी उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article