बेळगाव : मराठा बँकेचे संस्थापक, सहकार महर्षी कै. अर्जुनराव गोविंदराव घोरपडे यांची जन्मशताब्दी येत्या सोमवार दि. 2 सप्टेंबर 2024 रोजी दुपारी 3:30 वाजता साजरी केली जाणार असून या निमित्ताने मराठा मंदिर नूतनीकरणाचे उद्घाटन केले जाणार आहे, अशी माहिती मराठा को-ऑपरेटिव्ह बँक बेळगावचे ज्येष्ठ संचालक बाळाराम पाटील यांनी दिली आहे.
बाळाराम पाटील यांनी बेळगावच्या सहकार सामाजिक शैक्षणिक आणि सांस्कृतिक क्षेत्राच्या प्रगतीसाठी मोठे योगदान दिल्याबद्दल सहकार महर्षी कै. अर्जुनराव घोरपडे यांची जन्मशताब्दी येत्या सोमवारी साजरी केली जाणार आहे.
रेल्वे ओव्हर ब्रिज जवळील मराठा मंदिर येथे मराठा को-ऑपरेटिव्ह बँकेचे ज्येष्ठ संचालक बाळाराम पाटील अध्यक्षतेखाली होणाऱ्या या सोहळ्यास प्रमुख पाहुणे म्हणून माझी केंद्रीय कृषी व संरक्षण मंत्री खासदार पद्मविभूषण शरदचंद्रजी पवार आणि महाराष्ट्राचे माजी अर्थमंत्री आमदार जयंतराव पाटील उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे विशेष अतिथी या नात्याने महाराष्ट्राचे निवृत्त सहकार व पणन अधिकारी दिनेश ओऊळकर उपस्थित राहणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मराठा मंदिर नूतनीकरणाचे उद्घाटन केले जाणार आहे.
जन्मशताब्दी सोहळा स्वागत समितीचे सदस्य माजी प्राचार्य आनंद मेणसे यांनी यासंदर्भात बोलताना, पूर्वी पैशासाठी घरातील सोने सावकाराकडे गहाण ठेवले जायचे. मात्र त्यावेळी मराठा बँकेने इतकी चांगली योजना केली की या बँकेत सोने ठेवले की त्याचा लिलाव होत नाही असे लोकांचे एक ठाम मत झाले. त्यामुळे मराठा बँक नावारुपाला आली. आज बँक सुविधेचा लाभ गोरगरीब सर्वधर्मीय लोक घेत आहेत. हा विश्वास अर्जुनराव घोरपडे यांनी संपादन केला. सहकार क्षेत्रात होणारे निधी संकलन समाजाच्या उपयोगास आले पाहिजे. त्यासाठी त्यांनी सुरुवातीच्या काळात प्राथमिक व माध्यमिक शाळेच्या हजारो मुलांसाठी कपडे वाटपाचा उपक्रम सुरू केला. महिलांसाठी साडीचोळी उपक्रम राबविला. या पद्धतीचे विविध उपक्रम त्यांनी राबविले. थोडक्यात आपण असं काही काम केलं पाहिजे की ते समाजाच्या दीर्घकाळ उपयोगाच होईल. ही वास्तू उभी करून ते कार्य अर्जुनराव घोरपडे यांनी केले आहे. मराठा बँक, जिजामाता बँक उभी करणाऱ्या घोरपडे यांनी या पद्धतीने केलेली बरीच विधायक कामे फार महत्त्वाची आहेत, असे सांगितले.
अर्जुनराव घोरपडे यांना रिझर्व बँकेचे कायदे-कानून माहीत होते. त्यांच्यासारखा माणूस मी तरी पाहिलेला नाही. त्यामुळेच मराठा बँक ही राज्यातील सर्वात मोठी बँक म्हणून उदयास आली. सहकार क्षेत्रातील त्यांचा अनुभव दांडगा होता. शिक्षणामुळे माणूस मोठा होतो असे कांही नाही, वसंतदादा पाटील जागतिक बँकेचे चेअरमन होते. तसे या भागामध्ये अर्जुनराव घोरपडे यांचे कार्य आहे. त्यांनी जाणीवपूर्वक कोणत्याही राजकारणात भाग घेतला नाही. परंतु 1956 पासून या भागात सार्वत्रिक निवडणुकीसाठी मराठी उमेदवार निवडला गेला पाहिजे ही त्यांची भूमिका ठाम होती. बऱ्याचदा म. ए. समिती त्यांच्यावर उमेदवार निवडीची जबाबदारी सोबत असायची ते काम देखील ते वाईटपणा घेऊन नेटाने व्यवस्थित पार पाडत, असेही आनंद मेणसे यांनी म्हटले आहे.
मराठा बँकेचे संस्थापक, सहकार महर्षी कै. अर्जुनराव गोविंदराव घोरपडे यांचे योगदान त्यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने समाजापुढे यावं एवढाच जन्मशताब्दी सोहळ्याचा उद्देश असून अर्जुनराव घोरपडे यांच्या कार्य आणि योगदानाची माहिती देणारी एक स्मरणिका देखील सोहळ्यादरम्यान प्रकाशित केली जाणार आहे, अशी माहिती देण्यात आली आहे.
जन्मशताब्दी सोहळ्यासंदर्भात पत्रकारांना माहिती देताना मराठा को -ऑप. बँकेचे चेअरमन दिगंबर पवार, संचालक बाळासाहेब काकतकर, लक्ष्मण होनगेकर, मराठा मंदिरचे अध्यक्ष आप्पासाहेब गुरव, माजी महापौर मालोजीराव अष्टेकर आदी स्वागत समितीचे सदस्य उपस्थित होते.