बेळगाव, दिनांक 12 (प्रतिनिधी) : कायमस्वरूपी लोक अदालतीने वीज खात्याला दमदार शॉक दिला असून शेतकऱ्याच्या मृत्यूस हेस्कॉमचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरल्याचे सिद्ध झाल्याने हेस्कॉमला मृत शेतकऱ्याच्या कुटुंबियांना तब्बल 25 लाख 35 हजार रुपयांची नुकसान भरपाई देण्याचा आदेश दिला आहे.
शिवारात तुटून पडलेल्या विजभारीत तारेचा धक्का लागून जागीच गतप्राण झालेल्या बेळगाव तालुक्यातील बेळगुंदी येथील युवा शेतकरी कै. विक्रम महादेव पाऊसकर याच्या वारसदारांना ही नुकसानभरपाई द्यावी असा आदेश कायमस्वरूपी लोक अदालतचे अध्यक्ष रवींद्र पल्लेद तसेच सदस्या श्रीमती भारती वाळवेकर व श्रीमती चैतना मठपती यांनी हेस्कॉमला दिला आहे.
विक्रम महादेव पाऊसकर हा युवा शेतकरी 30 सप्टेंबर 2020 रोजी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास बेळगुंदी येथील आपल्या उसाच्या शिवारात उसावरील कीड प्रतिबंधक औषधाची फवारणी करण्यासाठी गेला होता. यावेळी शेतामध्ये तुटून पडलेल्या वीजभारित तारेचा स्पर्श त्यांना झाला आणि शॉक लागून विक्रम पाऊसकर यांचा जागीच मृत्यू झाला होता.
याप्रकरणी मताची पत्नी वैष्णवी पाऊसकर यांनी बेळगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात हेस्कॉमच्या निष्काळजीपणामुळे आपल्या पतीचा मृत्यू झाल्याची तक्रार दाखल केली होती. त्यानुसार पोलिसांनी याप्रकरणी सखोल तपास करून हेस्कॉमच्या अधिकाऱ्यांविरोधात न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले होते.
यानंतर मताची पत्नी, दोन मुले व आई-वडिलांनी कायमस्वरूपी लोक अदालत, बेळगाव येथे मयताच्या मृत्यू बाबत नुकसान भरपाईसाठी अर्ज दाखल केला होता. या दाव्यामध्ये अर्जदारांनी सादर केलेल्या साक्षी पुराव्यानुसार सदर घटनेला हेस्कॉमचा दुर्लक्षपणा कारणीभूत असल्याचे सिद्ध केले. यावेळी या घटनेला हेस्कॉम जबाबदार नसल्याचे पुरावे हेस्कॉमच्यावतीनेसुद्धा सादर करण्यात आले होते. मात्र अर्जदारांच्या साक्षीपुराव्यानुसार विक्रम पाऊसकर याच्या मृत्यूला हेस्कॉमचा निष्काळजीपणा पूर्णपणे कारणीभूत असल्याचे सिद्ध झाल्याने कायमस्वरूपी लोक अदालतने अर्जदारांचा नुकसानभरपाई अर्ज मंजूर करून मयताच्या वारसदारांना नुकसान भरपाई दाखल 21 लाख 58 हजार रुपये व त्यावर दावा दाखल केलेल्या तारखेपासून संपूर्ण नुकसान भरपाई भरेपर्यंत 6 टक्के वार्षिक व्याजाने असे एकंदर 25 लाख 35 हजार रुपये, निकालानंतर दोन महिन्याचे आत देण्याचा आदेश दिला.
अर्जदारांच्यावतीने बेळगाव बार असोसिएशनचे माजी प्रभारी अध्यक्ष ॲड. सुधीर बी चव्हाण यांनी काम पाहिले.