बेळगाव (bn7 news) : खानापूर येथील इलीट स्पोर्ट्स क्लब आयोजित 10 किलोमीटर अंतराच्या मिनी मॅरेथॉन स्पर्धेमध्ये तोप्पीनकट्टीच्या कल्लाप्पा तिरवीर यांनी वरिष्ठ गटात प्रथम क्रमांक मिळवत सुवर्णपदक पटकाविले.
होसमनी हॉल, खानापूर – पारीश्वड रोड येथे झालेल्या 10 किलोमीटर मिनी मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होत वरिष्ठांच्या गटात कल्लाप्पा तिरवीर यांनी विजयाचा झेंडा रोवला.
तोप्पीनकट्टी गावच्या कल्लाप्पा तिरवीर यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण तोपिनकट्टी गावातच झाले. घरची आर्थिक परिस्थिती कठीण. यामुळे उदरनिर्वाहाकरिता त्यांनी कोल्हापूर गाठले. तेथे मोलमजुरी करीत त्यांनी प्रगती साधली. आज ते एक स्वतंत्र उद्योजक आहेत.
ते रोज सकाळी नियमितपणे दहा किलोमीटर धावण्याचा सराव करतात. त्यांनी आजतागायत 500 पेक्षा अधिक स्पर्धांमध्ये भाग घेऊन आपली श्रेणी कायम राखली आहे. यामध्ये आशिया खंड आंतरराष्ट्रीय स्पर्धा तसेच राज्यस्तरीय स्पर्धेत त्यांनी आपले कर्तृत्व सिद्ध केले आहे. कोल्हापूरच्या एनआयएस प्रशिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली आज वयाच्या 53 व्या वर्षीही ते धावण्याचा सराव करतात.
त्यांच्या या यशाबद्दल खानापूर, बेळगाव, कर्नाटक व महाराष्ट्रातील मॅरेथॉन क्षेत्रात त्यांचे कौतुक होत आहे.