बेळगाव : 118 वर्षाची परंपरा असलेल्या येथील दि पायोनियर अर्बन को-ऑप. बँकेच्या संचालक मंडळाच्या निवडणुकीत प्रदीप अष्टेकर यांची पॅनल प्रचंड मतांच्या फरकाने विजयी झाले असून त्यांनी एक हाती विजय मिळवला आहे.
या निवडणुकीत विरोधकांची डिपॉझिट मात्र जप्त झाली आहेत.
संचालक मंडळाची ही पंचवार्षिक निवडणूक रविवारी कॅम्प येथील बी के मॉडेल हायस्कूलमध्ये संपन्न झाली. एकंदर 988 मतदारांपैकी 804 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून मतदान 81.3% झाले आहे.
सकाळी नऊ ते सायंकाळी चार या वेळात दोन बूथवर मतदान पार पडले. अतिशय उत्साहाने पार पडलेल्या या निवडणुकीत पायोनियर बँकेचे विद्यमान चेअरमन श्री प्रदीप अष्टेकर यांच्या नेतृत्वाखालील पॅनल होते. त्यामध्ये स्वतः प्रदीप मारुतीराव अष्टेकर ,रणजीत चव्हाण- पाटील, अनंत चांगाप्पा लाड, शिवराज नारायण पाटील, गजानन मल्लाप्पा पाटील, यल्लाप्पा पिराजी बेळगावकर आणि सुहास अर्जुन तराळ या उमेदवारांचा समावेश होता. तर त्यांच्या विरोधात अनिल देवगेकर व रवी दोड्डणावर हे उभे होते. तर महिला गटातील दोन जागांवर चार उमेदवार उभे होत्या. प्रदीप अष्टेकर यांच्या पॅनल मधून विद्यमान संचालिका सुवर्णा राजाराम शहापूरकर व अरुणा सुहास काकतकर तर विरोधी गटातून लक्ष्मी कानूरकर व दोडनावर या उभ्या होत्या. निवडणुकीचा निकाल जाहीर होताच विजयी उमेदवारांच्या पाठीराख्यांनी फटाक्यांची आतिषबाजी करून गुलालाची उधळण केली. निवडणूक अधिकारी म्हणून भरतेश सेबनावर यांनी काम पाहिले. बँकेच्या सीईओ अनिता मूल्य आणि कर्मचारी वर्गाने यांनी निवडणूक व्यवस्थित पार पडल्यास सहकार्य केले.
यापूर्वीच पायोनियर बँकेच्या संचालक मंडळात मागासवर्गीय ब गटातून श्रीकांत अनंतराव देसाई,ओबीसी ए गटातून विद्यमान संचालक गजानन ठोकणेकर, व मागासवर्गीय जमाती (एस टी) गटातून विद्यमान संचालक मारुती शिगिहळ्ळी हे बिनविरोध निवडून आले आहेत. तसेच मागासवर्गीय जाती गटातून मल्लेश चौगुले हेही बिनविरोध निवडून आले आहेत.
उमेदवारांना पडलेली मते पुढील प्रमाणे
1 प्रदीप अष्टेकर-669
2 अनंत लाड-444
3 रणजीत चव्हाण पाटील-427
4 गजानन पाटील-423
5 शिवराज पाटील-401
6 यल्लाप्पा बेळगावकर-396
7 सुहास तराळ-348
पराभूत उमेदवार
1 रवी धोंडनवर-118
2अनिल देवगेकर-80
महिला उमेदवार
1 सुवर्णा शहापूरकर-621
2 अरुणा काकतकर-560
पराभूत उमेदवार
1 पद्मा दोडनावर -101
2 लक्ष्मी कानूरकर-65
आपल्या पॅनलच्या विजयानंतर बोलताना अष्टेकर म्हणाले, की गेल्या काही वर्षात आम्ही एकजुटीने आणि एक दिलाने जे कार्य केले आहे त्याची ही सभासदांनी दिलेली पोचपावती आहे. सभासदांच्या विश्वासास पात्र राहण्यासाठी यापुढेही आम्ही अधिक सजगपणे काम करणार असून बँकेची प्रगती साधणार आहोत.