बेळगाव : ग्राहक हिताचा विचार करून टपाल खात्याद्वारे सुकन्या समृद्धी, पीपीएफ यासह आरोग्य विमा यासारख्या लाभदायक योजना राबविल्या जातात. ग्राहकांनी या योजनांचा लाभ घ्यावा असे आवाहन बेळगाव टपाल खात्याचे कार्यालयीन अधीक्षक विजय वादोनी यांनी केले.
शहापूर टपाल खात्याच्यावतीने आज शुक्रवारी सकाळी डाक जनसंपर्क अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. शहापूर नाथ पै सर्कल येथील नेताजी सुभाषचंद्र सांस्कृतिक भवनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
कार्यक्रमाच्या अध्यक्षांनी शहापूर टपाल कार्यालयाचे टपाल प्रमुख एस. पी. कांबळे होते. प्रमुख अतिथी म्हणून बेळगाव टपाल विभागाचे मुख्यालय सहाय्यक अधीक्षक आय. आर. मुतनळी, बेळगाव दक्षिण उपविभागाचे निरीक्षक एम. बी. शिरूर यासह नेताजी सुभाषचंद्र सांस्कृतिक भवनाचे चेअरमन परशुराम बामणे , सामाजिक कार्यकर्ते हिरालाल चव्हाण उपस्थित होते.
प्रारंभी पोस्टमन श्रीमती सविता जोळद यांनी इशस्तवन सादर केले. ज्येष्ठ पोस्टमन आर. व्ही. अंगडी यांनी उपस्थितांचे स्वागत केले. यावेळी व्यासपीठावरील मान्यवरांचा शाल, श्रीफळ आणि भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला. मान्यवरांनी रोपट्याला पाणी देऊन कार्यक्रमाचे उद्घाटन केले.
बेळगाव दक्षिण उपविभागाचे कार्यालय निरीक्षक एम. बी. शिरूर यांनी प्रास्ताविक भाषण केले. प्रास्ताविक भाषणात त्यांनी डाक जनसंपर्क अभियानाचा उद्देश सांगितला. पोस्टमन ही टपाल खात्याची ताकद आहे. ग्राहकांच्या उंबरठ्यापर्यंत जाऊन पोस्टमन ग्राहकांना सेवा देतात. यामुळे पोस्टमन आणि जनता यामधील नाते हे खूपच आपुलकीचे आहे. हे नाते अधिकाधिक बळकट व्हावे आणि टपाल खात्याकडून ग्राहकांना उत्तमोत्तम सेवा उपलब्ध करून देता यावी या अनुषंगाने टपाल खात्याच्यावतीने ग्राहकांसाठी विविध लाभदायक योजना राबविण्यात येत आहेत. या योजनांची माहिती ग्राहकाला उपलब्ध व्हावी यासाठी डाक जनसंपर्क अभियान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येत असल्याचे यावेळी बोलताना शिरूर यांनी सांगितले.
टपाल खात्याच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या सुकन्या समृद्धी, पीपीएफ आणि आरोग्य विमा या योजना ग्राहकांसाठी उपकारक आहेत. कमी पैशात जास्त सुरक्षा देणाऱ्या आरोग्य विमा योजना आणि समाधानकारक परतावा देणाऱ्या मुदत ठेव, पीपीएफ सारख्या योजनांचा लाभ नागरिकांनी घ्यावा असे आवाहनही शिरूर यांनी यावेळी केले.
आय. आर. मुतनळी यांनी यावेळी बोलताना, टपाल खात्याच्यावतीने एकाच छताखाली ग्राहकांना विविध हितकारी सेवा उपलब्ध करून दिल्या जात आहेत असे सांगत विविध योजनांची माहिती दिली. तसेच या योजनांचा सदुपयोग करून घ्यावा असे आवाहन केले.
सामाजिक कार्यकर्ते हिरालाल चव्हाण यांनी यावेळी मनोगत व्यक्त केले.
एस. पी. कांबळे यांच्या अध्यक्षीय भाषणाने कार्यक्रमाची सांगता झाली. अध्यक्षीय भाषणात कांबळे यांनी पोस्ट कार्यालयाच्या सेवा कार्याची माहिती देताना पोस्टाने जनमानसात आजही आपला विश्वास अबाधित ठेवला आहे. सर्वसामान्य जनतेच्या सेवेसाठी पोस्ट कार्यालय तत्पर आहे, ही अभिमानास्पद बाब असून याचे सारे श्रेय जन माणसाला प्रामाणिक सेवा देणाऱ्या पोस्टमन आणि टपाल खात्यातील कर्मचाऱ्यांना जाते असेही कांबळे यांनी म्हटले.
ज्येष्ठ पोस्टमन हुद्दार यांनी आभार मानले.
बी. आर. उमातर यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी एस. पी. कांबळे, अश्विनी व्ही. मंतुर्गीमठ, संतोष पुजार, दयानंद सदाशिवनवर, बी. आर. उमातर, आर. आय. अनिगोळ, वेंकटेश मबनूर, प्रभाकर कुट्रे, संतोष हट्टी, प्रियदर्शिनी हांचीनमनी, सविता जोळद, आर. व्ही. अंगडी, बुवनेश्वरी पुजार, बनश्री पी. इंगळदाळ यांनी विशेष परिश्रम घेतले.