Ad imageAd image

आज अण्णांचा जन्मशताब्दी सोहळा : दुपारी कार्यक्रमाचे आयोजन : राहणार शरद पवार उपस्थित

Ravindra Jadhav
आज अण्णांचा जन्मशताब्दी सोहळा : दुपारी कार्यक्रमाचे आयोजन : राहणार शरद पवार उपस्थित
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बहुजन समाजाचा आर्थिक कणा म्हणून बेळगावमधील मराठा सहकारी बँकेकडे पाहिले जाते. या बँकेचा पाया भक्कम करण्याचे काम सहकारमहर्षीअर्जुनराव घोरपडे उर्फ अण्णा यांनी केले.
आयुष्याचा पूर्ण वेळ सहकार क्षेत्राला देणारे आपल्या परिसरातील एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे अण्णा. खंबीर नेतृत्व, प्रामाणिकपणा, सचोटी या गुणामुळेच मराठा बँकेने जनमानसात लौकिक मिळविला. मराठा बँकेची वास्तू उभी करण्यात व आजचे वैभव प्राप्त करण्यात अण्णांचा सिंहाचा वाटा आहे. त्यांच्या जन्मशताब्दी सोहळ्यानिमित्त हा लेखन प्रपंच.

अर्जुनराव घोरपडे उर्फ अण्णांचा जन्म राकसकोप (ता. बेळगाव) येथे 15 ऑगस्ट 1924 रोजी एका अत्यंत गरीब शेतकरी कुटुंबामध्ये झाला. फक्त शेतीवर सर्वांचे पालन पोषण करणे कठीण झाल्याने वडिलांनी बेळगावात येऊन गाडी काम सुरु केले. गुळाचे रवे रविवार पेठेतून रेल्वे स्टेशनवर पोहोचवायचे काम ते करीत. अशा काबाडकष्टातून त्यांनी अण्णांना मोठं केलं.
घरची परिस्थिती बिकट असल्याने आवड असूनही अण्णांना शिक्षण पूर्ण करता आले नाही. वडीलांनी रविवार पेठेत दुकान चालू केल्याने वयाच्या पंधराव्या वर्षापासून अण्णांनी दुकानाची जबाबदारी अंगावर घेतली.

अण्णांच्या समाजकार्याला सन 1942 पासून सुरुवात झाली. बेळगावात छत्रपती शिवजयंती सार्वजनिकरित्या साजरी करण्याचे श्रेय गुरुवर्य शामराव देसाई, बहिर्जी शिरोळकर यांच्याबरोबरच अण्णांना जाते. यावेळेपासूनच गुरुवर्य शामराव देसाई यांची ओळख झाली. गुरुवर्यांनी अण्णांच्या अंगी असलेले नेतृत्वाचे गुण ओळखून 1952 साली मराठा बँकेच्या संचालक मंडळावर त्यांची निवड केली. सतत 61 वर्षे मराठा बँकेचे ते संचालक होते, त्यामध्ये 24 वर्षे त्यांनी चेअरमनपदाची धुरा सांभाळली. मराठा बँकेबाबत… १९४२ साली बहुजन समाजाला व्यापार, उद्योग, शिक्षण व घरबांधणी आदीसाठी सहाय्य करणारी एखादी आर्थिक संस्था असावी, ही निकड पाहून राष्ट्रवीरचे माजी संपादक गुरुवर्य कै. शामराव देसाई यांच्या मार्गदर्शनाखाली रंगुबाई पॅलेस येथे बहुजन समाजातील पुढारी मंडळीची बैठक झाली व दि मराठा को-ऑप. क्रेडीट सोसायटी या नावाने पांगुळ गल्ली येथे एका लहानशा भाडोत्री जागेत संस्थेचा शुभारंभ झाला. त्यावेळी सोसायटीचे पहिले चेअरमन म्हणून कै. नागोजीराव मिसाळ यांची निवड करण्यात आली. केवळ 104 सभासद व 3500 रुपये शेअर भांडवलावर सोसायटी चालू झाली. 946 साली कै. गजाननराव भातकांडे यांनी चेअरमनपदाची धुरा घेतल्यानंतर सोसायटीचे रुपांतर बँकेत करणे आवश्यक आहे असे जाणून आपल्या सहकाऱ्यांसह परिश्रमपूर्वक शेअर्स वाढवून 1948 साली सोसायटीचे बँकेत रुपांतर करण्यात आले. तेव्हापासून बँक झपाट्याने प्रगती करू लागली.

बँकेला स्वतःची इमारत असावी असे संचालक मंडळाला वाटू लागले व 1959 साली 68 हजार रुपये देऊन नरगुंदकर भावे चौकात जागा खरेदी केली. आणि मग स्वतःच्या इमारतीत बँकेचा कारभार सुरु झाला. कालातंराने ही जागाही अपुरी पडू लागल्यामुळे नवी अत्याधुनिक इमारत बांधण्याचे तत्कालीन संचालक मंडळाने ठरविले व 1977 साली बसवाण गल्लीतील सुंठणकर वाडा 39 हजार रुपयांना खरेदी केला. सदर जुन्या वाड्यातील जुने सामान 21 हजार रुपयांना विकण्यात आले. म्हणजेच सदर जागा केवळ 16 हजार रुपयांना संस्थेला मिळाली. अवघ्या तीन वर्षाच्या काळात सदर भव्य वास्तू उभी करण्यात आली. या सर्व घडामोडीत अण्णांचा सिंहाचा वाटा होता. त्यांच्या बरोबरच कै. शिवाजीराव काकतकर, कै. बाळकृष्ण भातकांडे, कै. अर्जुनराव हिशोबकर, कै. सदाशिवराव हंगिरकर, कै. परशराम हंडे आदी संचालकांनी विशेष परिश्रम घेतले. शहरातील अडत व्यवसाय मार्केट यार्ड येथे गेल्यानंतर 1973 साली तेथील व्यापाऱ्यांची अडचण ओळखून मार्केट यार्ड येथे 4950 रुपये देऊन जागा खरेदी केली व एक लाख रुपये खर्चुन – आलिशान इमारत बांधली. त्या ठिकाणी शाखा उघडण्यात आली. यामध्येही – अण्णांचा मोठा वाटा होता. सन 2001 साली अण्णांच्या मार्गदर्शनाखाली बँकेचे तत्कालीन चेअरमन कै. जी. एल. अष्टेकर यांच्या कार्यकाळामध्ये – गणपत गल्लीतील बँकेची जुनी इमारत पाडवून त्याठिकाणी नवीन इमारत – बांधण्यात आली, याठिकाणी आपली नरगुंदकर भावे चौक शाखा सुरु आहे.
मराठा बँक म्हणजे बहुजन समाजाचा आर्थिक कणा. हा कणा मजबूत करण्याचे काम अण्णांनी केले. आयुष्याचा पूर्ण वेळ सहकार क्षेत्राला देणारे आपल्या परिसरातील एकमेव व्यक्तिमत्त्व म्हणजे अण्णा. खंबीर नेतृत्व, प्रामाणिकपणा, सचोटी या गुणामुळेच मराठा बँकेच्या आर्थिक लौकिकास मदत झाली.

सर्वसामान्य माणूस हाच सहकारी चळवळीचा केद्रबिंदू मानून निस्सीम त्याग, सचोटी, व प्रामाणिकपणा या निकषावरच सहकारी संस्थेचे यश अवलंबून असते. बँकेचे व्यवस्थापन करीत असताना आर्थिक शिस्त व काटेकोरपणा कसा असावा हे अण्णांकडूनच शिकावे. संस्थेचा पैसा हा सामान्य माणसांचा असतो, विश्वस्थांनी त्याचा गैरवापर करु नये म्हणून त्यांचा कटाक्ष असे. निष्ठापूर्वक सेवा, वेळेची शिस्त व कार्य तत्परता या गुणांमुळेच त्यांच्या कार्याला उजाळा मिळाला. महिलांनी स्वावलंबी व्हावे याकरिता अण्णांनी 1974 साली कै. वसंतदादा पाटील यांच्या मार्गदर्शनातून जिजामाता महिला बँकेची स्थापना केली. कर्नाटक राज्यात महिलांनी चालविलेली एक अत्यंत प्रगत बँक असा या बँकेचा लौकीक आहे. मराठा समाजातील एक भारदस्त व्यक्तिमत्त्व म्हणजे आमचे सर्वांचे “अण्णा”. पांढरा शुभ्र सदरा, पायजमा व पांढरी टोपी ही त्यांची ओळख होती. अण्णांचे मराठा समाजाबरोबरच इतर समाजामध्येही एक वेगळे स्थान होते. माजी सभापती कै. रामभाऊ पोतदार, कै. बा. म. गोगटे, कै. गणपतराव कुलकर्णी, श्री. किरण ठाकूर, श्री. गोविंद फडके, गफारशेट मुजावर, कै. सुरेश अंगडी, श्री. एस. डी. सुणगार, हॉटेल अजंठाचे श्री. शेरेगार आदी समाजातील प्रतिष्ठित मान्यवरांशी अण्णांचे घनिष्ठ संबंध होते.

अण्णांना व्यायामाची प्रचंड आवड होती, आपला समाज व्यसनमुक्त व आरोग्यसंपन्न रहावा यासाठी त्यानी रामतत्त्व योगमंदीराची स्थापना केली. एकाच वेळी अण्णांनी बेळगावातील अनेक संस्थातून काम केले आहे. मराठा मंडळ, दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ, जत्ती मठ, रंगुबाई ट्रस्ट या संस्थामधूनही त्यांनी काम केले आहे. मार्कडेय साखर कारखाना उभारणीतही त्यांचा मोलाचा वाटा आहे. जवळपास 25 ते 30 संस्थांतून त्यांनी समाजकार्य केले आहे. महाराष्ट्र एकीकरण समितीच्या प्रत्येक लढ्यात ते सामील होत होते. समितीचे आमदार निवडून आणण्यात त्यांचा महत्त्वाचा वाटा होता. बँकेच्या संचालक मंडळात कै. अर्जुनराव हिशोबकर व कै. जी. व एल. अष्टेकर हे दोन आमदार अण्णांच्या सोबत होते.

मराठा समाजाचा मानबिंदू समजावा अशी मराठा मंदिर वास्तू अण्णांच्या प्रयत्नातूनच उभी राहिली. ग्रामीण भागातील गरीब मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणूनही त्यांनी अनेक शैक्षणिक व आर्थिक उपक्रम राबविल आहेत. कुद्रेमानी येथे हायस्कूलची बिल्डिंग उभारण्यातही त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
बेळगाव जिल्हा अर्बन बँक असोशिएशन स्थापन करण्यात पुढाकार घेतला. कित्येक वर्षे ते या फेडरेशनचे अध्यक्ष होते. तसेच कर्नाटक स्टेट फेडरेशनचेही ते सदस्य होते. गरीब मुले शिक्षणापासून वंचित राहू नयेत म्हणून यासाठी माळमारुती येथे मराठा वसतीगृह उभारले आहे. समाजातील तळागाळातील जनतेची लग्नकार्ये कमीत कमी खर्चात होण्याकरिता नवीन कार्यालय बांधण्याचा त्यांचा मानस होता.
आजवर बँकेने रौप्य, सुवर्ण व अमृत महोत्सव साजरे केले आहेत. अण्णांचा मा. शरदराजवी पवार यांच्याशी घनिष्ठ संबंध होता. बँकेच्या सर्व कार्यक्रमांना पवार साहेब हजर होते. अण्णांच्या आग्रहाखातर अनेक दिग्गजांनी बँकेला भेट दिली आहे. त्यामध्ये माननीय अण्णासाहेब शिंदे, वसंतदादा पाटील, बाळासाहेब देसाई, एन. डी. पाटील, रणजित देसाई, सुशिलकुमार शिंदे, ए. बी. जकनूर, यशवंतराव चव्हाण, बाबासाहेब पुरंदरे, शंकरराव चव्हाण, दत्ता बाळ, उदयसिंगराव गायकवाड, पैलवान सतपाल, बॅ. पी. जी. पाटील, न्या. कोळसे-पाटील, मान. अजित सेठ, मल्लीकार्जुन खर्गे, विलासराव देशमुख, बाबासाहेब कुप्पेकर, दिग्वजिय खानविलकर, अॅड. उज्वल निकम, श्री. के. रंगनाथन, बसवलिंगाप्पा, सदाशिवराव मंडलिक, एच. के. पाटील, रा. कृ. कणबरकर, सुरेश प्रभू, इ. मान्यवरांनी बँकेला भेटी दिलेल्या आहेत. अण्णांनी सामाजिक व आर्थिक संस्थातून काम करताना सर्वांना सामावून घेत अनेक कार्यकर्त्यांना तयार केले. तसेच प्रत्येक संस्थेत दुसरी फळीही तयार केली. आपल्या बँकेची घोडदौड पुढे नेण्यासाठी श्री. दीपक दळवी, श्री. बाळाराम पाटील, श्री. बाळासाहेब काकतकर, श्री. एल. एस. होनगेकर, श्री. दिगंबर पवार, श्री. सुशिलकुमार खोकाटे यांच्या खांद्यावर धुरा सोपविली. अण्णांनी घालून दिलेल्या वाटेवरून बँकेची वाटचाल यशस्वीरित्या सुरू आहे.
दिनांक 31 मार्च 2024 अखेर बँकेचे 12808 सभासद असून भाग भांडवल 2 कोटी 83 लाख आहे. बँकेचे रिझर्व फंडस् रु. 66 कोटी 62 लाख आहेत, ठेवी रु. 219कोटी 56 लाख आहेत, कर्जे 155 कोटी 77 लाख बँकेचा ग्रॉस एन. पी. ए. 1.38 टक्के आहे व नेट एन. पी. ए. 0 टक्के आहे. दि. 31 मार्च 2024 अखेर बँकेने रु. 2 कोटी 75 लाख निव्वळ नफा मिळविलेला आहे. बँकेची आर्थिक परिस्थिती भक्कम आहे. बँकेचे खेळते भांडवल 330 कोटी 12 लाख आहे. अनेक वर्षे बँक सभासदांना 15 टक्के डिव्हीडंड देत आहे.

मराठा बँकेचा डोलारा भक्कमपणे सांभाळणाऱ्या अशा हरहुन्नरी व्यक्तिमत्वाचे दिनांक 10 एप्रिल 2013 रोजी वयाच्या 89 व्या वर्षी निधन झाले, त्यांच्या जाण्याने मराठा बँकेसह इतरही संस्था पोरक्या झाल्या आहेत. असे हे प्रभावी व्यक्तिमत्त्व आमच्या बँकेला लाभले हे आम्ही आमचे भाग्य समजतो.

श्री. दिगंबर पवार
मराठा बँक, विद्यमान चेअरमन

श्री. बाळासाहेब काकतकर
मराठा बँक, माजी चेअरमन

शब्दांकन : श्री. संजय गुरव, शाखा व्यवस्थापक

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article