बेळगाव : बेळगाव येथील दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित भाऊराव काकतकर पदवी महविद्यालयाचे प्राणीशास्त्र विभागाचे विभागप्रमुख प्राध्यापक विक्रम लक्ष्मणराव पाटील हे आपल्या 35 वर्षांच्या प्रदीर्घ प्राध्यापकी सेवेतून दि. 31 मे 2024 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यानिमित्त त्यांचा अल्प परिचय .
प्रा .विक्रम पाटील यांचा जन्म बेळगाव येथे दिनांक 1 जून 1964 रोजी एका सधन, सुशिक्षित, सात्विक व प्रेमळ कुटुंबात झाला .
वयाच्या सहाव्या वर्षी कोल्हापूर जिल्ह्यातील महागाव येथील मराठी माध्यम शाळेत ते चौथीपर्यंत शिकले. त्यानंतर महागाव येथील शिवाजी विद्यालयात त्यांनी इयत्ता पाचवीला प्रवेश घेतला आणि या माध्यमिक विद्यालयात त्यांनी दहावीपर्यंत शिक्षण घेतले.
त्यांचे वडीलही माध्यमिक विद्यालयात मुख्याध्यापक होते .त्यामुळे घरी नेहमीच शैक्षणिक वातावरण होते. विक्रम पाटील हे शालेय जीवनापासून एक हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जायचे .
प्रत्येक माणसाचा त्याच्या जीवनामध्ये कोणी ना कोणी आदर्श असतोच. विक्रम पाटील सरांचा आदर्श त्यांचे वडील लक्ष्मणराव पाटील आणि त्यांचे काका शंकरराव पाटील अर्थात दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाचे माजी सचिव तसेच ज्योती पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य कै. एस. वाय. पाटील सर होते.
आदरणीय प्राचार्य व्ही. ए .पाटील सर यांनी या पाटील बंधूंबद्दल सांगितलेला एक किस्सा आहे, तो असा की, जेव्हा लक्ष्मणराव पाटील आणि शंकरराव पाटील हे मराठा मंडळ हायस्कूल बेळगाव येथे शिकत होते. ते भाऊ शाळेत हुशार विद्यार्थी म्हणून ओळखले जात होते. त्यामुळे शाळेतील अनेक विद्यार्थी त्यांची मैत्री करण्यास धडपडत असत . लक्ष्मणराव पाटील हे अभ्यासात हुशार होते; तर शंकरराव पाटील हे सामाजिक कार्य आणि नेतृत्व करण्यात अग्रेसर होते. अशी शिक्षणाची उज्ज्वल परंपरा असलेल्या घरात जन्मलेले प्रा. विक्रम पाटील सर हे अर्थातच हुशार विद्यार्थी म्हणून परिचित होते. त्यामुळे त्यांचे शालेय शिक्षण आनंदात आणि यशस्वीपणे पूर्ण झाले.
प्रा . विक्रम पाटील हे दहावीची परीक्षा चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाले. दहावी नंतर पुढे काय ? असा प्रश्न सर्वसामान्य विद्यार्थ्यांना पडत असावा .सरांना असा प्रश्न पडला नाही. कारण सरांचे वडिलच मुख्याध्यापक होते तर काका प्राध्यापक होते . त्यामुळे दहावीनंतर पुढे काय हा प्रश्न त्यांना पडला नसावा .
त्यांचा अभ्यासातील कल आणि विज्ञान विषयाची आवड यामुळे त्यांनी दहावी नंतर बेळगाव येथील जी .एस. एस. विज्ञान महाविद्यालयात विज्ञान शाखेत प्रवेश घेऊन याच महाविद्यालयातून बी. एस. सी पदवी संपादन केली. अन् ते पदवीधर झाले. त्यानंतर धारवाड येथील कर्नाटक विद्यापीठ ‘ येथे त्यांनी एम. एस. सी साठी प्रवेश घेऊन ‘ प्राणीशास्त्र ‘ या विषयात चांगल्या गुणांनी एम एस सी.ही पदवी मिळविली.
पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केल्यानंतर शिक्षण क्षेत्रात कार्य करण्याची आवड असल्यामुळे सन 1989 साली ते दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ संचलित ज्योती पदवीपूर्व महाविद्यालयात ‘ प्राणीशास्त्र ‘ या विषयाचे प्राध्यापक म्हणून रूजू झाले. दोन वर्षे ज्योती महाविद्यालयात सेवा बजावल्यानंतर सन 1991 साली ते भाऊराव काकतकर पदवी महाविद्यालयात ‘ प्राणीशास्त्र ‘ या विषयाचे प्राध्यापक म्हणून कार्य करू लागले. पुढे याच महाविद्यालयात ‘ प्राणीशास्त्र ‘ विभागप्रमुख म्हणून त्यांनी निवृतीपर्यंत या विभागाची धुरा समर्थपणे सांभाळून या विभागाचा विकास केला .
शिक्षण क्षेत्रात काम करत असतानाच त्यांनी सामाजिक कार्यही केले . बेळगावात येथील सह्याद्री या बहुउद्देशीय सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष म्हणूनही त्यांनी उल्लेखनीय कार्य करून पतसंस्थेच्या प्रगतीत भर घातली आहे. तसेच दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या एम्प्लॉइज सोसायटीचेही ते विद्यमान अध्यक्ष आहेत.
प्रा . विक्रम पाटील सर यांना शालेय जीवनापासूनच वाचनाचा’ छंद आहे.त्यामुळे आतापर्यंत त्यांनी अनेक पुस्तके वाचली आहेत. आताही कामाचा एवढा व्याप असला तरीही ते वेळ काढून चांगल्या पुस्तकांचे वाचन करतात .
ज्याप्रमाणे बुद्धीचा विकास होण्यासाठी वाचनाची गरज आहे, त्याप्रमाणे शरीराचा विकास होण्यासाठी खेळाची गरज आहे. हे ओळखून त्यांनी संस्थेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांसाठी ‘ खेलोत्सव ‘ सारखे उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या क्रीडा गुणांना वाव देऊन चांगले खेळाडू घडवण्याचा प्रयत्न सुरू केला आहे. याशिवाय संस्थेच्या शाळांमधील शिक्षकांमध्ये अध्यापन कौशल्य निर्माण करुन एक उपक्रमशील शिक्षक बनविण्यासाठी वर्षातून किमान दोन कार्यशाळा आयोजित करून शिक्षकांमध्ये नव चैतन्य निर्माण करण्यावर त्यांचा भर असतो.
सन 2015 साली ‘ दक्षिण महाराष्ट्र शिक्षण मंडळ या शैक्षणिक संस्थेचा सहसचिव हा पदभार त्यांच्यावर सोपविण्यात आला. त्यांनी आपल्या निर्णय कौशल्याने तो पदभार समर्थपणे सांभाळून आपल्या कामाचा ठसा उमटविला .सहसचिव पदाचा कार्यभार पाच वर्षे सांभाळल्यानंतर सन 2020 साली संस्थेचे सचिव या पदाची धुरा सर्वानुमते त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. सन 2020 पासून ते सचिव म्हणून कार्यरत असून अतिशय कौशल्याने सर्वांना बरोबर घेऊन ते ही धुरा समर्थपणे सांभाळत आहेत .
सरांच्या या शैक्षणिक ,सामाजिक कार्याची दखल घेऊन महाराष्ट्रातील एका नामवंत संस्थेने त्यांना ‘ प्राइड ऑफ इंडिया ‘ हा पुरस्कार देऊन त्यांच्या कार्याचा गौरव केला आहे.
प्रा .विक्रम पाटील सर शैक्षणिक क्षेत्रात भरीव कार्य करून आपल्या 35 वर्षांच्या प्रदीर्घ प्राध्यापकीय सेवेतून दि. 31 मे 2024 रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांचे निवृत्तीचे जीवन सुखासमाधानाने आणि आरोग्यदायी जावो हीच सदिच्छा !
– शिवाजी हसनेकर
एल. बी. एस. विद्यालय मणगुत्ती
.