बेळगाव, दिनांक 14 : न्यू गुड्सशेड रोड, शास्त्रीनगर – बेळगाव येथील विमल कॉम्लेक्स- विमल प्राईड संकुल सभागृहात सालाबाद प्रमाणे यावर्षीही गणहोम, अथर्वशीर्ष पठण आणि महाप्रसाद कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
विमल फाउंडेशन या सेवाभावी संस्थेचे संस्थापक – अध्यक्ष आणि मराठा समाजाचे युवा नेते किरण जाधव यांच्या उपस्थितीत हा धार्मिक उपक्रम पार पडला.
सकाळी विधीवतरीत्या गणहोम झाला. विनायक कुलकर्णी भटजी यासह पाच भटजींनी या कार्यक्रमाचे पौरोहित्य केले. विशेष म्हणजे यजमान म्हणून सिंधी, मारवाडी, गुजराती, जैन, मराठा, पंजाबी, लिंगायत यासह अन्य धर्मातील धर्मातील नऊ जोडपी गणहोम पूजेला बसली होती.
गण होम कार्यक्रमानंतर 21 वेळा अथर्वशीर्ष पठण करण्यात आले. अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमालाही परिसरातील भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
यानंतर महाप्रसाद वितरण कार्यक्रम झाला. परिसरातील भाविकांनी मोठ्या संख्येने महाप्रसादाचा लाभ घेतला.
मागील 15 वर्षांपासून विमल फौंडेशनच्यावतीने गण होम, अथर्वशीर्ष पठण आणि महाप्रसाद कार्यक्रम आयोजित केला जात असल्याचे विमल फौंडेशनचे चेअरमन किरण जाधव यांनी यावेळी बोलताना सांगितले. तसेच फौंडेशनच्या वतीने राबविल्या जाणाऱ्या विविध सेवाभावी उपक्रमाबद्दल माहिती दिली.
याप्रसंगी महेश शर्मा, संदीप जाधव, मंगलानी, श्रीकांत देसाई, अनिल जैन यासह उत्सव मंडळाचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते तसेच परिसरातील मान्यवर उपस्थित होते.