1 नोव्हेंबर रोजी काळ्यादिनी खानापुरात निषेध सभा : बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

Ravindra Jadhav
1 नोव्हेंबर रोजी काळ्यादिनी खानापुरात निषेध सभा : बहुसंख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : 1 नोव्हेंबर रोजी काळ्यादिनी खानापूर तालुक्यातील मराठी भाषिकांनी कडकडीत हरताळ पाळावा आणि खानापुरात होणाऱ्या निषेध सभेला बहुसंख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजित बैठकीत करण्यात आले.

खानापूर तालुका महाराष्ट्र एकीकरण समितीची बैठक खानापूर येथील शिवस्मारक येथे पार पडली, या बैठकीच्या अध्यक्षस्थानी खानापूर तालुका समितीचे अध्यक्ष सूर्याजी पाटील हे होते.

एक नोव्हेंबर 1956 रोजी भाषांतर प्रांत रचना झाली त्यावेळच्या मुंबई प्रांतातील निपाणी, बिदर, भालकी, बेळगाव, खानापूर, सुपा, कारवार, असा बहुसंख्येने मराठी भाषिक असणारा भूभाग कर्नाटकाला जोडून केंद्र सरकारने महाराष्ट्रावर व मराठी भाषेवर अन्याय केला. त्यादिवशी पासून एक नोव्हेंबर हा दिवस सीमा भागातील मराठी भाषिक सुतक दिन म्हणून पाळत आलेले आहेत.
येणारा एक नोव्हेंबर हा खानापूर तालुक्यातील मराठी भाषिकांनी कडकडीत हरताळ म्हणून पाळावा,असे आवाहन ज्येष्ठ नेते संभाजी देसाई यांनी बैठकीत केले.

काही दिवसांपूर्वी बेळगावच्या जिल्हाधिकाऱ्यांनी मराठी भाषिकांनी एक नोव्हेंबर रोजी निषेध व्यक्त न करता इतर दिवशी करावा असे सुचवले होते. त्यावर बोलताना खानापूर युवा समितीचे अध्यक्ष धनंजय पाटील यांनी सांगितले एक नोव्हेंबर 1956 पासून आज पर्यंत लोकशाहीने दिलेल्या हक्का नुसार आम्ही हा दिवस निषेध दिन म्हणून केंद्र सरकारचा निषेध करत आलेलो आहोत. यावर्षी सुद्धा केंद्र सरकारचा निषेध याच दिवशी होणार आहे.
मागील लोकसभेच्या प्रचाराच्या वेळी कारवार लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार म्हणून सध्याचे खासदार श्री विश्वेश्वर हेगडे-कागेरी यांनी समितीच्या ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली होती. त्यावेळी सुद्धा समितीच्या नेत्यांनी विश्वेश्वर हेगडे कागेरी यांना आपले सातबारा उतारे मराठीमध्ये द्यावेत व शासकीय कारभार मराठीमध्ये चालावा असे सुचवले. पण निवडून आल्यानंतर त्यांनी सुद्धा मराठी भाषिकांच्या तोंडाला पाणी पुसण्याचे कार्य केले आहे, असे माजी सभापती सुरेश देसाई यांनी यावेळी बोलताना लक्षात आणून दिले.

येणारा एक नोव्हेंबर काळा दिन खानापुरातील मराठी भाषिकांनी कडकडीत हरताळ पाळावा व केंद्र सरकारचा निषेध करण्यासाठी एक नोव्हेंबर रोजी एकत्र जमावे असे बैठकीत सांगण्यात आले.
यावेळी पी. एच. पाटील, बळीराम पाटील, रवींद्र पाटील, दत्तू कुट्रे, बाळासाहेब चिनवाल व सचिव राजू पाटील आदी उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article