बाल शिवाजी वाचनालयाचा ५१ वा वर्धापन दिन साजरा

Ravindra Jadhav
बाल शिवाजी वाचनालयाचा ५१ वा वर्धापन दिन साजरा
WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now

बेळगाव : मच्छे येथील श्री बाल शिवाजी सार्वजनिक वाचनालयाचा ५१ वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.
या कार्यक्रमाला प्रमुख वक्ते म्हणून बुक लवर्सचे किशोर काकडे तर प्रमुख पाहुणे म्हणून रेनबो ऑफसेट प्रिंटिंग प्रेस चे मालक सतीश जाधव सर उपस्थित होते.

कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती श्री शिवाजी महाराजांच्या पूजनाने झाली. यानंतर शिवानी व भवानी चौगुले या छोट्या मुलींच्या समूहाने स्वागतगीत सादर केले.

प्रत्येक पुस्तक हे एक गुरुच आहे, ग्रंथालय म्हणजे अशा अनेक गुरुंचे स्थान आहे.
शालेय विद्यार्थ्यांनी,वाचकांनी नियमित वाचन करावे. वाचनामुळे आपल्या व्यक्तिमत्त्वामध्ये सुधारणा होते. वाचनामुळे मनुष्याचे सर्वांगीण व्यक्तिमत्व सुधारते.
विद्यार्थ्यांनी शालेय वाचना बरोबरच, अवांतर वाचन सुद्धा केले पाहिजे. त्यामध्ये कथा,कादंबऱ्या,चरित्र, व्यक्तिमत्व विकास, शैक्षणिक अशी पुस्तके वाचली पाहिजेत. मुलांनी व विद्यार्थ्यांनी भेटवस्तू म्हणून पुस्तके दिली पाहिजेत. वाढदिवस,सण समारंभ यामध्ये इतर आहेर न करता पुस्तक रुपी भेट दिली पाहिजे. त्यामुळे आपला समाज वाचनाच्या संपर्कात येईल. आपल्या आई-वडिलांनी मुलांशी संवाद साधला पाहिजे. त्यांची प्रेमाने आपुलकीने विचारपूस केली पाहिजे. कारण सर्वच गोष्टींसाठी शाळेवर विसंबून न राहता, घरातून आई-वडिलांनी मुलांचा अभ्यास घेतला पाहिजे. त्यांच्यावर चांगले संस्कार केले पाहिजेत.
सर्वांनी आपल्या मातृभाषेवर, आपल्या भारत भूमीवर प्रेम केले पाहिजे.
शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे जीवन समजून घेतले पाहिजे. मुलांनी स्वच्छता व शिस्त कायम जोपासली पाहिजे. कुठेही केरकचरा न करता तसेच व्यसनाधीनतेच्या आहारी न जाता आपले जीवन शिस्तबद्ध व सुखकर केले पाहिजे, असे किशोर काकडे यावेळी बोलताना म्हणाले.

अविनाश ओगले यांनी, ‘ जगण्याचे जर भान पाहिजे, वाच पुस्तके ‘ ही कविता सादर केली तसेच अरुणिमा सिन्हाची रोमांचक कथा सांगितली.अशा कथा जाणून घेण्यासाठी वाचनालयातील पुस्तके वाचा.हर घर तिरंगा प्रमाणे हर घर ग्रंथालय निर्माण करा.असे विचार त्यांनी मांडले. आपलं गाव,शहर,शाळा स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी ही आपली आहे आणि आपली जात विसरून देश महत्वाचा आहे हा विचार त्यांनी मांडला. देश की रक्षा हम सब करेंगे ही घोषणाही त्यांनी शिकवली.

काकडे यांनी, ‘ भगिनी निवेदिता व कथा शिलास्मारकाची ‘ ही पुस्तके ग्रंथालयास भेट म्हणून दिली.
तसेच विद्यमान अध्यक्ष संभाजी कणबरकर यांनी आपल्या वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ वाचनालयाला पुस्तके भेट दिली.
वाचनालयाचे संस्थापक सदस्य अनंत लाड व कृष्णा भोमाणी अनगोळकर यांनी वाचनावर, व वाचनालयावर आपले मौलिक विचार मांडले.
यावेळी उपस्थित बुक लवर्सचे किशोर काकडे, रेनबो ऑफसेटचे सतीश जाधव, वाचनालयाचे संस्थापक सदस्य अनंत लाड,शिवाजीराव कणबरकर, निवृत्त सुभेदार राजू बस्तवाडकर, तसेच वाचनालयाच्या नूतन पदाधिकाऱ्यांचा सत्कार करण्यात आला.

बॉक्सिंग मध्ये उत्तुंग झेप घेतलेली विद्यार्थिनी शिवानी अनिल धूडुम हिचा वाचनालयातर्फे विशेष सत्कार करण्यात आला.

विद्यमान अध्यक्ष संभाजी कणबरकर व उपाध्यक्ष सूर्यकांत मरूचे यांचा ब्रह्मेशानंद स्वामीजी गोवा यांचे बेळगाव स्थित भक्तगण, तसेच महाराष्ट्र एकीकरण युवा समिती, यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रम प्रसंगी वाचन चळवळ वाढावी वाचनालय वृद्धिंगत व्हावे यासाठी सतीश जाधव, कृष्णा अनगोळकर, संभाजी कणबरकर, पुंडलिक कणबरकर, सुशील धामणेकर, शिक्षक गजानन धामणेकर,अमोल पवार, अरुण पाटील यांनी भरीव अशी देणगी दिली.
कान्सूली शाळेचे शिक्षक विनायक चौगुले यांनी सूत्रसंचालन केले.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संतोष जैनोजी, वासुदेव लाड, केतन चौगुले, पुंडलिक कणबर्गी, गजानन छप्रे, दीपक सनदी, संदीप वाघोजी, सिद्धांत धामणेकर, सुशील धामणेकर,अरुण कुंडेकर, सागर कणबरकर, सुशांत कणबरकर, शिवराज लाड, गजानन मजुकर, सुशांत चौगुले, प्रशांत नांदोडकर, नितीन जगताप, सुहास गोरल, सागर जैनोजी, संजय कांबळे, राजू कलखांबकर व सर्व सभासदांनी व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.
या कार्यक्रमाला वाचनालयाचे वाचक, गावकरी, महिलावर्ग, व विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.

WhatsApp Group Join Now
Telegram Group Join Now
Share This Article